लॉकडाऊनचा भंग; दोन महिन्यात सुमारे साडे सहा कोटींची वसूली
कोविड संदर्भात राज्यात अत्यावश्यक सेवेसाठी ४ लाख ५३ हजार पास वाटप करण्यात आले असून आता राज्यात ५ लाख ६० हजार व्यक्ती
क्वारंटाइन आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून ६ कोटी ४२ लाखांचा दंड वसून करण्यात आला आहे. अशी माहिती अनिल देशमुख
यांनी दिली आहे.
मुंबईः करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आला. या कालावधीत अत्यावश्यक सेवांना सूट देण्यात आली. या अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्यांना व मुंबईबाहेर जाऊ इच्छिणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना पास दिले जात होते. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात ४ लाख ५३ हजार ४७७ पास पोलीस विभागामार्फत देण्यात आले. तसंच, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कलम १८८ नुसार १,२२, ७७२ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून विविध गुन्ह्यांसाठी ६ कोटी ४२ लाख ८३ हजार २११ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
राज्यात २२ मार्च रोजी लॉकडाऊन घोषित करण्यात आला. दरम्यान २२ मार्च ते ४ जून या कालावधीत कलम १८८ नुसार १,२२,७७२ गुन्हे नोंद झाले असून २३,८२७ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. तर, विविध गुन्ह्यांसाठी ६ कोटी ४२ लाख ८३ हजार २११ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
कडक कारवाई
कोरोनाच्या संकटात पोलिस कर्मचारी, आरोग्य विभाग, डॉक्टर, परिचारिका यांच्यावर हल्ला करणाऱ्यांवरही कडक कारवाईचे आदेश पोलिस विभागाला गृहमंत्रालयाकडून देण्यात आले होते. दरम्यान, पोलिसांवर हल्ला होण्याच्या २५८ घटना घडल्या असून त्यात ८३८ व्यक्तींना ताब्यात घेतले आहे.
आठवड्यातून एकदा ऑफिसला या, अन्यथा पगार कापणार; सरकारचे आदेश
३१ पोलिसांचा मृत्यू
करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अहोरात्र सेवा देणाऱ्या पोलिस दलात करोनाचा संसर्ग वेगानं पसरत आहेत. मुंबईतील १८ पोलीस व १ अधिकारी अशा एकूण १९, पुणे २, सोलापूर शहर २, नाशिक ग्रामीण ३, ए.टी.एस. १, मुंबई रेल्वे १, ठाणे ग्रामीण २, जळगाव ग्रामीण १ अशा ३१ पोलिसांचा करोनामुळं मृत्यू झाला आहे. प्रशासनानं पोलिसांमध्ये करोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, यासाठी राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. सध्या १९५ पोलीस अधिकारी व १३०४ पोलीस कोरोना बाधित असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
No comments:
Post a Comment