महाराष्ट्रातून आजवर सुमारे ११ लाखांच्या आसपास श्रमिक व्यवस्था केलेल्या विशेष गाड्यांद्वारे गेले आहेत. तसेच चार लाखांच्या आसपास बसद्वारे परतले आहेत. स्वतःची गाडी करून गेलेल्या प्रवाशांची संख्या ही नऊ ते दहा लाखांच्या आसपास आहे.
मुंबई : लॉकडाउनमुळे महाराष्ट्रात अडकलेल्या आणि परत जाऊ इच्छिणाऱ्या श्रमिकांचा ओघ आता मंदावला असल्याचे दिसत आहे. गेल्या महिनाभरात दररोज ४० ते ४५ रेल्वे गाड्या या श्रमिकांसाठी सोडल्या जात होत्या; त्यांची संख्या आता १० ते १२ गाड्यांवर आली आहे. तर परप्रांतात नोकरी किंवा व्यवसायानिमित्त गेलेले सुमारे ३ लाख मराठीजनही परतले आहेत. मात्र परराज्यातून महाराष्ट्रात पायी येणाऱ्यांचे प्रमाण अगदीच नगण्य असल्याचेही वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
तामिळनाडू सरकारचे पत्र
गरीब श्रमिकांसाठी उपलब्ध करून दिलेल्या गाड्यांमधून केवळ त्यांनीच प्रवास केला की ज्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे, अशांनीही लाभ घेतला, याबाबत प्रश्नचिन्ह आहे. तामिळनाडू सरकारने महाराष्ट्र सरकारला याबाबत एक पत्रच लिहिले आहे. महाराष्ट्रातून तामिळनाडूत आलेले सगळेच प्रवासी हे श्रमिक वा आर्थिकदृष्ट्या नाडलेले वाटत नाहीत, असे पत्रातून कळवल्याचे एका ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्याने 'मटा'शी बोलताना सांगितले.
बंधने अशक्य
गेल्या आठवड्यात परप्रांतात जाणाऱ्या काही लोकांनी नवे टीव्हीही बरोबर नेल्याची छायाचित्रे सरकारकडे अधिकृत सूत्रांकडून आली होती. अशा प्रवाशांना प्रतिबंध घालता येणे शक्य आहे का, अशी विचारणा काही स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली होती. मात्र आर्थिक निकषानुसार या प्रवाशांना बंधने घालणे शक्य नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र चांगली आर्थिक स्थिती असूनही सरकारी उपाययोजनेचा फायदा उचलल्यास एका गरीब माणसाची संधी त्यातून हुकते. त्यामुळे याबाबत स्वतःच सारासार विचार करून नागरिकांनी निर्णय घेणे गरजेचे असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.
No comments:
Post a Comment