Ahmednagar latest Corona Update| उपचारासाठी पुण्याला गेले, करोना घेऊन आले |Went to Pune for treatment, brought Corona
उपचारासाठी पुण्याला गेले, करोना घेऊन आले
मुलीवर उपचारासाठी पुण्यातील एका हॉस्पिटलमध्ये जाऊन आलेल्या राशीन (ता. कर्जत) येथील एका व्यक्तीला करोनाची लागण झाली आहे. या व्यक्तीने राशीनला येण्यापूर्वी मुलीच्या गावी श्रीगोंद्यातही काही काळ वास्तव्य केल्याने दोन्ही ठिकाणी संपर्कात आलेल्या व्यक्तींची आता तपासणी करण्यात येत आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी संदीप पुंड यांनी दिली.
कर्जत तालुक्यातील राशीन येथील साठ वर्षीय व्यक्तीला करोनाची लागण झाली आहे. त्यानंतर आरोग्य विभागाने केलेल्या चौकशीत ही माहिती पुढे आली आहे. राशीनमधील व्यक्तीची मुलगी श्रीगोंद्यात आहे. ती आजारी होती. तिच्यावर उपचार करण्यासाठी ते पुण्यातील के. ई. एम. हॉस्पिटलमध्ये गेले होते. तेथे काही काळ त्यांनी वास्तव्य केले. नंतर श्रीगोंद्याला परत आले. मुलीच्या घरी असतानाच या व्यक्तीला त्रास होऊ लागला. त्यामुळे तेथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले. थोडे बरे वाटू लागल्याने आपल्या मूळ गावी राशीनला आले. तेथे आल्यावर पुन्हा तब्येत बिघडल्याने राशीनमधील एका खासगी हॉस्पिटलमध्ये गेले. तेथे तपासणी केल्यावर त्यांना नगरच्या जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. तेथे प्राथमिक लक्षणे आढळून आल्याने त्यांची करोनाची चाचणी घेण्यात आली असता ती पॉझिटीव्ह आली आहे.
त्यामुळे आता आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या श्रीगोंद्यातील दहा व राशीनमधील सात जणांची तपासणी करण्यात येत आहे. राशीनमधील करोनाचा हा आठवा रुग्ण आहे. बहुतांश जणांना बाहेरून आल्यामुळेच लागण झाल्याचे आढळून आलेले आहे. तर श्रीगोंदा तालुक्यात सध्या एकही रुग्ण नाही. आता मात्र पुन्हा चिंता व्यक्त केली जाऊ लागली आहे. दोन्ही तालुक्यांत प्रशासनाने पुन्हा दक्षतेचे उपाय हाती घेतले आहेत. दोन्ही तालुक्यांतील करोनाची साखळी तुटली असे, वाटत असतानाच नवा रुग्ण आढळून आल्याने नागरिकांमधूनही चिंता व्यक्त केली जात आहे. राशीनमध्ये पूर्वी मुंबईहून आलेल्या एका करोनाबाधित महिलेचा मृत्यूही झालेला आहे. तिच्या संपकार्त आलेल्या कुटुंबातील इतरांनाही लागण झाली होती. अलीकडेच ते बरे होऊन घरी परतले आहेत.
No comments:
Post a Comment