'शेतकरी उपाशी, व्यापारी तुपाशी', शेतमाल विक्रीचा काळाबाजार, आमदार मंगेश चव्हाणांकडून भांडाफोड
चाळीसगाव येथील शेतकी संघात शेतकऱ्यांच्या नावावर व्यापाऱ्यांची मका, ज्वारी, हरभरा यांची विक्री होत असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे (Black Market of Grains in Jalgaon).
Black Market of Grains in Jalgaon |
जळगाव : चाळीसगाव येथील शेतकी संघात शेतकऱ्यांच्या नावावर व्यापाऱ्यांची मका, ज्वारी, हरभरा यांची विक्री होत असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे (Black Market of Grains in Jalgaon). हा प्रकार स्वतः आमदार मंगेश चव्हाण यांनीच उघडकीस आणला आहे. त्यामुळे शेतकी संघातील मोठा काळाबाजार उघड झाला आहे. काही शेतकऱ्यांनी याबाबत तक्रार केल्यानंतर आमदार चव्हाण यांनी हा भांडाफोड केला.
खऱ्या शेतकऱ्यांना वंचित ठेऊन शेतकी संघाचे काही पदाधिकारी व्यापाऱ्यांची मका, ज्वारी, हरभरा यांची विक्री करत होते. यामुळे पदाधिकारी आणि व्यापारी मालामाल होत होते, मात्र शेतकऱ्यांना बाजूला केलं जात होतं. त्यामुळे शेतकरी उपाशी आणि व्यापारी तुपाशी अशीच काहीशी परिस्थिती तयार झाली होती. हा सर्व प्रकार संगनमताने चालला होता. मोजके व्यापारी आपला शेतीमाल केंद्रावर विकत होते. याबाबत आमदार मंगेश चव्हाण यांनी राज्याचे पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासह जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांना सविस्तर पत्र लिहून दोषींवर कडक कारवाईची मागणी केली.
शेतकऱ्यांचा शेतात पडून असलेला शेतीमाल तात्काळ खरेदी करण्याऐवजी त्यांना भूलथापा द्यायच्या. दुसरीकडे व्यापारी माल खरेदी करायचा हा प्रकार अनेक दिवसांपासून सुरु होता. यावर तक्रार करुनही काहीही कारवाई झाली नाही. त्यामुळे रविवारी (14 जून) चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार व्यापाऱ्याचा हरभरा विक्रीसाठी शेतकी संघात आला असता त्यावर छापा घालून पकडण्यात आला.
एकीकडे सुट्ट्या आणि पावसाचे कारण दाखवून कापूस आणि मका खरेदी बंद केली जात आहे. मात्र, दुसरीकडे रविवारी सुट्टी असूनही व्यापाऱ्यांचा माल खरेदी केला जात असल्याचा गंभीर प्रकार लक्षात आला. यानंतर जवळपास 2 मोठ्या वाहनांमध्ये 100 क्विंटलहून अधिक हरभरा पकडून महसूल पोलीस प्रशासनाकडे देण्यात आला. याबाबत आमदार मंगेश चव्हाण यांनी जिल्हा मार्केटिंग अधिकारी, तहसिलदार, पोलीस प्रशासन यांना दोषीवर कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत. शेतकऱ्यांच्या टाळूवरचे लोणी खाणारे सहभागी असतील त्यांची गय केली जाणार नाही, असं आश्वासन आमदार मंगेश चव्हाण यांनी दिलं आहे.
हेही वाचा :
No comments:
Post a Comment