E-School Reopens | ना शाळेची घंटा, ना सवंगड्यांची भेट, वर्च्युअल शाळा उघडल्या, ई-शिक्षणाचा श्रीगणेशा
महाराष्ट्र अनलॉक होण्याच्या दिशेने टप्प्याटप्प्याने वाटचाल करत आहे. मात्र विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने तूर्तास तरी शाळा ऑनलाईनच उघडण्यात आल्या आहेत. (Maharashtra SSC Board E School Reopens)
Maharashtra SSC Board E School Reopens |
मुंबई : 13 जून म्हणजे शाळेचा पहिला दिवस हे समीकरण वर्षानुवर्षे अनेकांच्या मनात घट्ट रुजलेलं आहे. पण यंदा ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सगळं वेळापत्रकच बदललं. शाळेची घंटा, कोऱ्या करकरीत वह्या-पुस्तकांचा गंध, सवंगड्यांना पुन्हा भेटण्याची ओढ, नव्या बाई-गुरुजींना जाणून घेण्याची आस या सर्व हौस-मौजेला विद्यार्थ्यांना मुरड घालावी लागली. कारण 15 जूनच्या मुहूर्तावर शाळा उघडल्या, तेव्हा विद्यार्थी ‘क्लासरुम’मध्ये ‘एन्टर’ होणार नसून संगणकावर ‘एन्टर’चे बटण दाबून वर्च्युअल क्लासरुममध्ये हजेरी लावत आहेत. (Maharashtra SSC Board E School Reopens)
महाराष्ट्र अनलॉक होण्याच्या दिशेने टप्प्याटप्प्याने वाटचाल करत आहे. मात्र विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने तूर्तास तरी शाळा ऑनलाईनच उघडण्यात आल्या आहेत. काही बोर्डाच्या शाळा आधीच उघडल्या असल्या तरी महाराष्ट्रात एसएससीच्या शाळा आज ऑनलाईन सुरु झाल्या आहेत. ई-स्कूलमुळे विद्यार्थांना शारीरिक ताण येण्याची शक्यता व्यक्त करत काही पालक आणि संघटनांनी विरोध दर्शवला होता, मात्र कुठल्याही परीस्थितीत विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये, ही भूमिका घेत राज्य सरकारने शाळांचे टाळे ऑनलाईन उघडले.
शाळेच्या पहिल्या दिवशी पालक दाराशी सोडायला आल्यानंतर रडारड करणारे चिमुरडे यंदा दिसणार नाहीत. अनेक शाळांमध्ये ‘झूम’ किंवा ‘गुगल मीट’सारख्या डिजिटल माध्यमातून वर्ग सुरु झाले आहेत.
कुठे टेक्नोसॅव्ही विद्यार्थी स्वतःच ऑनलाईन शिक्षण घेण्यात पुढाकार घेत आहेत, तर कुठे तंत्रज्ञानाविषयी अनभिज्ञ असलेल्या पालकांची तारांबळ उडत आहे. कोणी इंटरनेट कनेक्शनविषयी साशंक आहे, तर कुठे वर्क फ्रॉम होम करणाऱ्या पालकांची मुलांच्या शाळेच्या वेळा सांभाळण्याची दुहेरी कसरत सुरु झाली आहे.
‘बालभारती’ने इयत्ता पहिली ते बारावीच्या पाठ्यपुस्तकांच्या पीडीएफ विनामूल्य डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध करुन दिल्या आहेत. तसेच ‘क्यूआर कोड’च्या माध्यमातून ई-पाठ्यपुस्तकेही वाचता येणार आहेत. त्यामुळे नवख्या पद्धतीशी जुळवून घेताना पहिल्या दिवशी तरी विद्यार्थी खुशीत असल्याचं म्हटलं जातं.
No comments:
Post a Comment