१४ वर्षांच्या मुलीला जीवनदान; 'त्या' पोलिसाला सर्वांनी केला सलाम
ताडदेव सशस्त्र विभागात कार्यरत असलेले आकाश गायकवाड हे बुधवारी माझगाव येथे नेमणुकीला होते. याचवेळी एका मित्राचा व्हॉट्सअॅप मेसेज आला. यामध्ये सना फातीम खान (१४) या मुलीची हिंदुजा रुग्णालयात ओपन हार्ट सर्जरी असून त्यासाठी ए पॉझिटिव्ह या रक्तगटाची गरज आहे, असे नमूद करण्यात आले होते.
मुंबई
करोना संकटकाळात जिवाची बाजी लावून कर्तव्य बजावणाऱ्या खाकी वर्दीने 'माणुसकी हाच धर्म' हे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. हिंदुजा रुग्णालयात एका १४ वर्षांच्या मुलीची शस्त्रक्रिया केवळ रक्त मिळत नसल्याने रखडली होती. करोनामुळे धास्तावल्याने घरात अडकलेले लोक आणि बाहेर घोंगावणाऱ्या चक्रीवादळाच्या धोक्यामुळे वेळीच रक्त उपलब्ध होण्याची चिन्हे दिसत नव्हती. अशावेळी पोलिस कॉन्स्टेबल
आकाश गायकवाड यांनी तात्काळ हिंदुजा रुग्णालयात धाव घेऊन रक्तदान केले आणि वेळेत शस्त्रक्रिया पार पडली.
ताडदेव सशस्त्र विभागात कार्यरत असलेले आकाश गायकवाड हे बुधवारी माझगाव येथे नेमणुकीला होते. याचवेळी एका मित्राचा व्हॉट्सअॅप मेसेज आला. यामध्ये सना फातीम खान (१४) या मुलीची हिंदुजा रुग्णालयात ओपन हार्ट सर्जरी असून त्यासाठी ए पॉझिटिव्ह या रक्तगटाची गरज आहे, असे नमूद करण्यात आले होते. गायकवाड यांचा रक्तगट हाच असल्याचे मित्राच्या लक्षात आले आणि त्याने हा संदेश गायकवाड यांच्या मोबाइलवर पाठवला. गायकवाड यांनी क्षणाचाही विलंब न लावता रक्त देण्याची तयारी दाखवली आणि ते हिंदुजा रुग्णालयात पोहोचले.
रुग्णालयात डॉक्टरांनी गायकवाड यांची तपासणी करून रक्त घेतले आणि शस्त्रक्रिया पार पडली. 'मला जाती-धर्म, ओळख यापेक्षाही माझ्यामुळे कुणाचा जीव वाचत असेल तर रक्तदान केले पाहिजे, हे महत्त्वाचे वाटले. म्हणूनच रक्तदान केल्याचे गायकवाड म्हणाले.
नियमित रक्तदाते
करोना संकटामुळे राज्यात रक्ताचा तुटवडा भासत असल्याने रक्तदान करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे वारंवार करत आहेत. मानवनिर्मित किंवा नैसर्गिक आपत्तीमध्ये कर्तव्य बजावत असलेले पोलिस या कार्यातही पुढाकार घेत आहेत. वर्षातून चार वेळा रक्तदान करणारे माटुंगा पोलिस ठाण्यातील सहायक फौजदार सुनील कर्पे यांनी मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत रक्तदान केले. त्यांनी नुकतेच ३२ व्यांदा रक्तदान केले. 'रक्तदान केल्याने कोणाचे तरी प्राण वाचण्यास मदत होते,' असे कर्पे सांगतात. तर एटीएसमधील कॉन्स्टेबल बलराज साळोखे यांनीही नुकतेच रक्तदान केले. साळोखे हे देखील नियमित रक्तदान करतात.
No comments:
Post a Comment